भूम : "शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, पंचनामे होताच तात्काळ मदत मिळून दिली जाईल," असे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी (दि.२३) दिले. भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ते पत्रकारांशी बोलत होते.
महाजन म्हणाले, "ओला दुष्काळ, सरसकट नुकसानभरपाई अशा ठिकाणी वेगवेगळे निर्णय आवश्यक आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत परिस्थिती पोहोचवली जाईल व योग्य निर्णय घेण्यात येईल. मोठ्या प्रमाणावर शेती, घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अधिकारी रात्रंदिवस पंचनाम्यासाठी काम करत असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल." यावेळी मंत्री महाजन यांनी शेतकरी भारत रामभाऊ मोरे यांच्या द्राक्ष बागेतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी भावनावश होऊन मोरे यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, नितीन काळे, बाळासाहेब शिरसागर, महादेव वडेकर, संतोष सुपेकर, हेमंत देशमुख, सरपंच विशाल ढगे, बाळासाहेब अंधारे, निरंजन ढगे, रामदास विधाते, रोहित ढगे, नितीन सुरवसे, भगवान सुरवसे, सुधीर ढगे, बालाजी विधाते आदींसह शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, चिंचपूर ढगे येथे आल्यानंतर बाणगंगा नदीतील लहान पूल काढून टाकण्याची मागणी शेतकऱ्यांनी महाजन यांच्यासमोर केली. या पुलामध्ये झाडे-झुडपे अडकून नदीचा प्रवाह बदलत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पूल काढून टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला घेराव मागे घेतला.