

जळगाव : नाशिकच्या पालकमंत्री पदावरून निर्माण झालेल्या चर्चेवर उत्तर देताना राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, "मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे कुणाला पालकमंत्री करायचं आणि कुणाला मंत्री करायचं. त्याशिवाय काहीही होणार नाही. पालकमंत्री पदावर दावा करणं चुकीचं नाही. छगन भुजबळ जर म्हणत असतील की ते होणार आहेत, तर तो त्यांचा अधिकार आहे." महाजन यांनी पुढे टोला लगावत म्हटले, "मुख्यमंत्री ठरवतील तर भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्रीही होऊ शकतात!"
लाडकी बहीण योजनेसाठी 40-50 कोटी रुपये खर्च वाढल्याच्या चर्चेवर महाजन म्हणाले, "हे आधीच लिखित स्वरूपात आलेले आहे. यात काहीही नवीन नाही. जवळपास 30 हजार कोटींचा खर्च वाढलेला आहे. मात्र कुठलाही निधी नियमबाह्य वळवला जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल." ते म्हणाले, "लाडकी बहीण योजनेसाठी पैसे देणं आवश्यक आहे, पण अन्य खात्यांवर अन्याय होणार नाही. निधी दिला असेल तर तो तात्पुरता असेल आणि तो पुन्हा मूळ खात्यात वळवला जाईल."
शेतकरी आंदोलनावर बोलताना महाजन म्हणाले, "शेतकऱ्यांना आंदोलनाचा अधिकार आहे. पोलीस त्यांच्या विरोधात कारवाई करतील असं नाही. या संदर्भात नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भूसंपादन मोबदल्याबाबत सध्या सविस्तर चर्चा सुरू आहे."
ते पुढे म्हणाले, "ज्या ठिकाणी रस्ता होतो आहे, त्या भागात एकनाथ खडसे यांनी वर्षभरापूर्वी जमीन घेतली आहे. मी आधीही हे सांगितलं आहे, मात्र खडसे म्हणतात ती जमीन वडिलोपार्जित आहे. यासंदर्भात पुरावे देण्याची जबाबदारी त्यांची आहे."
महिला आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून हटवावे, असा आशय असलेले पत्र रोहिणी खडसे यांनी दिले असून, याबाबत मुख्यमंत्री नक्कीच विचार करतील, असंही महाजन यांनी यावेळी स्पष्टच सांगितलं.