Maharashtra Government 3 Months Ration Monsoon 2025
दादासाहेब लगाडे
वाशी : संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीत नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी शासनाने जून महिन्यात एकाच वेळी पुढील जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे रेशन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ३० जूनपर्यंत तीन महिन्यांचे रास्तभाव दुकानातून धान्य उचलावे लागणार आहे.
यावर्षी अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हा पाऊस महिनाभर अधूनमधून सुरूच होता. तसेच मोसमी पाऊस सुरू झाला आहे. या पावसानेही दमदार सुरुवात केली. जिल्ह्यात अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. अजूनही सतत पाऊस सुरूच आहे.
दरम्यान, पावसामुळे रेशनचे धान्य मिळण्यात लाभार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये, या उद्देशाने अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांसाठी एकदाच रेशन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना पुढील दोन महिने पावसापाण्यात भिजत रेशन घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नाही.
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांतून जून, जुलै व ऑगस्टचे तीन महिन्यांचे रेशन एकदाच देण्याचा निर्णय घेतला आहे अतिवृष्टी, पूर परिस्थितीत त्रास होऊ नये म्हणून ३० जूनपर्यंत वाटप पूर्ण करण्याचे वरिष्ठांनी निर्देश दिले आहेत.
राज्यात दरवर्षी पावसाळ्यात अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होते. यामुळे शिधापत्रिका धारकांना रेशन मिळवण्यासाठी अडथळे येतात. यावर्षी अशा त्रासापासून नागरिकांना वाचवण्यासाठी पुरवठा विभागाने ही योजना आखली आहे.
प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला तीन महिन्यांचे धान्य मिळेल यात गहू, तांदळ व डाळ आदींचा समावेश आहे. जून महिन्यातच शिधावाटप केंद्रांवरून जुलै आणि ऑगस्टचे धान्यही वाटप करण्याचे निर्देश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळेत स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपले रेशन उचलावे लागणार आहे.