Gajanan Maharaj's palanquin welcomed in Tuljapur
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगाव (जि. बुलढाणा) येथून श्री गजानन महाराज यांची पालखी दिंडीचे श्री क्षेत्र तुळजापूर येथे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी स्वागत केले.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने गजानन महाराज यांच्या पालखीचे हार, शाल व श्रीफळ अर्पण करून सन्मानपूर्वक स्वागत केले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी एक वेळच्या जेवणाचा शिधा प्रदान करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावाने जपली गेली. श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लेखाधिकारी संतोष भेंकी, स्थापत्य अभियंता राजकुमार भोसले, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) द्वयी अनुप ढमाले व रामेश्वर वाले, तसेच महेंद्र आदमाने, विश्वास कदम व देवींचे अनेक भक्तगण उपस्थित होते.
हजारोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीने मंदिर परिसर गजबजून गेला होता. विठुनामाच्या गजराने आणि तुळजाभवानी देवींचा उदघोष करत आलेल्या दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता.
वारकरी संप्रदायाची ही अखंड परंपरा, त्याग, सेवा आणि भक्ती यांचे प्रतीक असलेली दिंडी दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीमय वातावरणात पुढे प्रस्थान करतअसून, विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरातती ४ जुलै रोजी पोहोचणार आहे.