Flood hits Paranda taluka; Household goods destroyed
परंडा, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यातील वागेगव्हाण, शिराळा व परिसरातील गावे पुराच्या पाण्यात पूर्णपणे झाकोळली गेली आहेत. यामुळे अनेक कुटुंबांचा संसार उद्धस्त झाला असून, शेती पिके, घरे व दुकाने यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बाधितांना तातडीने मदत मिळण्याची गरज व्यक्त होत आहे.
वागेघव्हाण येथील शरदकुमार कुलकर्णी यांच्या घरासह त्यांच्या कृषी सेवा केंद्र दुकानातील २० ते २५ लाखांचा माल पाण्यात गेला आहे. केळी बाग, ऊस, इतर पिके वाया गेली असून, विहिरी गाळाने भरल्या आहेत. पुराच्या पहिल्याच रात्री त्यांच्या मुलाला सर्पदंश झाल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल होता. कुटुंबातील सदस्यांना शेजाऱ्यांनी अक्षरशः खांद्यावर घेऊन सुरक्षित स्थळी पोहोचवले.
मात्र मदतीचा हात मात्र कुणाकडूनही पोहोचला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सीना नदीच्या महापुरामुळे शिराळ्यात कांद्याचे पीक पूर्णतः उद्धस्त झाले. भिजल्याने कांदा जागेवरच सडला आहे. कांदा उत्पादक दत्तात्रय आहिरे यांनी सांगितले, की पुराच्या पाण्यात सगळे काही नष्ट झाले आहे. उधारी कशी फेडायची, मुलांचे पोट कसे भरायचे हा मोठा प्रश्न आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची, तसेच भरपाई रकमेत वाढ करण्याची मागणी केली आहे. अन्यथा उभं राहणं कठीण होईल, अशी आर्त विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.
केळी बागा उद्ध्वस्त
त्याच परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पाण्यामुळे झाडांची मुळे सडण्याचा धोका निर्माण झाला असून भविष्यातील उत्पादनावरही परिणाम होणार आहे. शेतकरी अनिल कांबळे म्हणाले, केळी लागवडीसाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र पुरामुळे सर्व मेहनतीवर पाणी फिरले. सरकारने तातडीने मदत करावी.