भूम : भूम-परांडा तालुक्यातील शेळगाव (मौजे माणिकनगर) येथे जन्मदात्या बापाने चौथीत शिकणाऱ्या आपल्या पोटच्या मुलीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गौरी ज्ञानेश्वर जाधव (वय ९) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असून ज्ञानेश्वर महादेव जाधव असे हत्या करणाऱ्या निर्दयी बापाचे नाव आहे. या निर्दयी माणसाने आपल्या बायकोला देखील जाळून ठार मारले होते, अशी माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२८) रात्री ९ ते रविवारी (दि.२९) सायंकाळी ४.३० च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गौरी ही वारंवार आजारी पडत होती, तसेच काही दिवसांपूर्वी सायकलवरून पडली होती. या कारणांवरून संतापलेल्या ज्ञानेश्वर जाधव याने राहत्या घरी रागाच्या भरात धारदार कुऱ्हाडीने डोक्यात, कपाळावर व दोन्ही खांद्यावर सपासप वार करून हत्या केली. याप्रकरणी जाधव याच्याविरोधात आंबी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. पुढील तपास सपोनि गोरक्ष खरड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे गौरी ही मंगल जाधव या तिच्या आजीकडे राहत होती. शनिवारी रात्री ती घरी आली असताना जाधव याने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून तिची निर्दयीपणे हत्या केली. हे प्रकरण उघड होऊ नये म्हणून ही गोष्ट कोणाला सांगू नकोस अशी धमकी आपल्या आईला (गौरीच्या आजीला) दिली. या घटनेमुळे आजीला जबर मानसिक धक्का बसला आहे. ज्ञानेश्वर जाधवने याआधी आपल्या पत्नीला देखील जाळून ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांचा असा क्रूर अंत झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे. या प्रकाराने संपूर्ण समाजमन हादरले असून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.