अमरावतीत पोलीस अधिकाऱ्याची निर्घृण हत्या; अपघाताचा बनाव रचून केले तब्बल १५ वार

Amravati Police officer murder|क्रूर हत्येच्या घटनेने अमरावती पोलीस दलात खळबळ
Amravati Police officer murder|
Amravati Police officer murder|Pudhari Photo
Published on
Updated on

अमरावती : वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांची शनिवारी (दि. २८) अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सुरुवातीला अपघाताचा देखावा निर्माण करण्यात आला, मात्र त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्रांचे १२ ते १५ घाव आढळल्याने हा पूर्वनियोजित हत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेने अमरावती पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अपघाताचा बनाव रचून निर्घृण हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय अब्दुल कलाम (वय ५४, रा. जमील कॉलनी) हे शनिवारी सायंकाळी आपल्या मोपेडवरून (एमएच २७ डीव्ही ६१४२) वलगाव पोलीस ठाण्यात ड्युटीसाठी जात होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास, चांगापूर फाट्याजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीला अल्टो कारने (एमएच ३४ बीआर ६६५३) समोरून जोरदार धडक दिली.

या धडकेत कलाम खाली कोसळताच, हल्लेखोरांनी कारमधून उतरून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. त्यांच्या पोट आणि पाठीवर सपासप वार करण्यात आले. हल्लेखोरांनी त्यांना गाडीखाली चिरडण्याचाही प्रयत्न केला. या निर्घृण हल्ल्यात कलाम यांचा डावा पाय गुडघ्यापासून वेगळा झाला.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

एएसआय कलाम हे एक शांत, मनमिळाऊ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते. दोन वर्षांनी ते सेवानिवृत्त होणार होते. शनिवारी घडलेली ही घटना त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी ठरली, कारण त्याच दिवशी त्यांच्या लहान मुलीचा, तहरीन फातेमाचा, डॉक्टर झाल्याचा निकाल लागला होता. मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी सकाळीच घरी पेढे वाटले होते. मात्र, काही तासांतच या आनंदावर विरजण पडले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या कलाम यांना एका ऑटो चालकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त सागर पाटील यांच्यासह गुन्हे शाखा, वलगाव पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे शहरातील पोलीस दलात शोककळा पसरली असून, जिल्हा रुग्णालयात सहकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news