Farmers' demand for diesel in cans
उमरगा, पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल देत नसल्यामुळे त्रिकोळी ता उमरगा येथील वैतागलेल्या ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांनी कॅनसहित गुरुवारी, (दि ०४) तहसील कार्यालय गाठले. यावेळी कॅनमध्ये डिझेल देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पेट्रोल पंपमालक सध्या डिझेलचा तुटवडा असल्याचे सांगून ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देत नसल्याच्या घटना घडत आहेत. ट्रॅक्टर पंपावर घेऊन या मगच डिझेल भरून देऊ म्हणत कॅनमध्ये डिझेल देत नाहीत. शेतापासून पेट्रोल पंपाचे अंतर लांब आहे. त्यातच कामावरील चालू ट्रॅक्टर पंपावर आणणे परवडणारे व शक्य नाही.
पंपधारक कॅनमध्ये डिझेल भरायला नकार देत आहेत. याला वैतागलेल्या त्रिकोळी येथील ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांनी डिझेलच्या मागणीसाठी हातात रिकामे कॅन घेऊन चक्क तहसील कार्यालय गाठत तहसीलदारांना निवेदन दिले.
यावेळी कॅनमध्ये डिझेल देण्यास पंप चालकांनी टाळाटाळ केल्यास आंदोलनांचा इशारा दिला आहे. यावेळी सदानंद तुकशेट्टी, अकबर पटेल, ज्ञानेश्वर मुगळे, महेश कोडगीर, हरी सुरवसे, तात्याराव अंबुलगे, लक्ष्मण शिंदे आदींसह ट्रॅक्टर मालक शेतकरी उपस्थित होते.