Bhoom taluka farmer death
भूम : अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्याने त्रस्त झालेल्या भूम तालुक्यातील हिवरा येथील अल्पभूधारक शेतकरी बंडू वासुदेव जगदाळे (वय ४०) यांनी मध्यरात्री शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे दीड ते दोन एकर क्षेत्रातील अतोनात नुकसान झाले होते. शेत नदीलगत असल्याने पिके पाण्याखाली गेली होती. केवळ तीन एकर शेती असलेले बंडू जगदाळे हे अल्पभूधारक शेतकरी होते. अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि हातात काहीच पर्याय नसल्याने त्यांनी नैराश्यातून टोकाचा निर्णय घेतला.
या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. याआधीच भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील एका शेतकऱ्याने जीवन संपविले होते. हिवरा येथील ही दुसरी घटना असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गात भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.