Dharashiv rain news: भूम तालुक्यात पुन्हा पावसाचा हाहाकार! सीना नदीच्या पुराचा पुन्हा धोका, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन

Bhoom taluka heavy rain news: परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे
Dharashiv rain news
Dharashiv rain news
Published on
Updated on
Summary

Dharashiv Sina river flood latest news

ठळक मुद्दे

साडेसांगवी पुलावरून शेतकऱ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास

वाकडी, आंबी, गोसावीवाडी, जेजला मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे.

पाझर तलाव फुटण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

तानाजी सुपेकर

भूम: तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले आहे. दोन दिवसांच्या उसंतीनंतर शुक्रवार (दि. २६ सप्टें) रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अद्याप थांबायचं नाव घेतलेलं नाही. परिणामी तालुक्यातील अनेक भागांमध्ये परिस्थिती बिकट झाली असून अंतर्गत वाहतूक कोलमडली आहे.

शनिवारी (दि.२७ सप्टें.) सकाळी साडेसांगवी येथील पुलावरून नदीचा पाण्याचा प्रवाह इतका वाढला की, गावातील शेतकरी व दूध उत्पादकांना जीव मुठीत धरून दोरीच्या साहाय्याने नदी पार करावी लागली. याचा मोठा परिणाम दूध संकलनावरही झाला आहे.

सीना नदीचा पुन्हा धोका

गेल्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे परंडा व भूम तालुक्यात सीना नदीने प्रचंड हाहाकार माजवला होता. त्यावेळी दोन जणांचा बळी गेला होता तर ४०० ते ५०० पशुधन वाहून गेले होते. नुकतीच एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांच्या मदतीने बचावकार्य सुरू होते. मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद

वाकडीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भूम-वारदवाडी रस्ता बंद झाला आहे. तसेच आंबी, गोसावीवाडी, जेजला मार्ग आणि मुग गावाकडे जाणारे रस्ते पूर्णपणे ठप्प झाले आहेत. पर्यायी पूल वाहून गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन..

पात्रुड, बेदरवाडी, जयवंतनगर, राळेसांगवी, पाठसांगवी, साडेसांगवी, बेलगाव- पिंपळगाव, वालवड, सामनगाव, गणेगाव या नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बेदरवाडी व नान्नजवाडी पाझर तलाव धोक्याच्या स्थितीत असून फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईट येथील संगमेश्वर प्रकल्पावर पाणी ओसंडून वाहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतरवली येथील पुलाचा काही भाग पाण्यामुळे धोकादायक स्थितीत आला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान, गिरवली परिसरातील मांजरा नदीच्या पात्रातून पाणी बाहेर पडून शेतात शिरले आहे. त्यामुळे सोयाबीनसह इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रशासनाची सतर्कता

धाराशिव जिल्ह्याला जोडणारा भूम-जामखेड-अहमदनगर मार्गही पूरपाण्यामुळे बंद करण्यात आला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस सुरूच असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news