Electricity generation is high, but why load shedding?: MLA Patil
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा राज्यात मागणीपेक्षा अधिक वीज निर्मिती होत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असताना ग्रामीण भागात लोडशेडिंग का केले जात आहे, असा सवाल आ. कैलास पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला.
औचित्याच्या मुद्द्याद्वारे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य 'ऊर्जा अधिशेष' असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास सिंगल फेज वीज कपात केली जात आहे.
त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात तब्बल आठ तास वीज खंडितीचा सामना करावा लागत आहे. संध्याकाळी सहा ते दहा आणि सकाळी पाच ते नऊ या वेळेत नियमितपणे लोडशेडिंग होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
तसेच शेतीपंपांसाठीही परिस्थिती गंभीर असून २४ तासांपैकी केवळ तीन ते चार तासच वीज उपलब्ध होत आहे. त्यातही पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे त्यांनी सांगितले.
सरकारने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ग्रामीण भागातील लोडशेडिंग थांबवावे तसेच शेतीपंपांना नियमित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. पाटील यांनी केली.