ईट : यंदा उन्हाळ्याची तीव्रता अपेक्षेपेक्षा लवकर वाढल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. साधारणपणे एप्रिलनंतर सुरू होणारा उष्णतेचा प्रभाव यावर्षी मार्चपासूनच जाणवू लागला असून गेल्या काही दिवसांत तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे अडगळीत पडलेले कूलर, पंखे दुरुस्त करण्यासाठी नागरिकांची लगबग वाढली आहे.
एरव्ही मे महिन्यात उष्णतेचा कडाका सर्वाधिक असतो. मात्र, मागील काही वर्षांपासून ईटसह परिसरातील तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा चढल्याने नागरिक धास्तावले असून गर्मीपासून बचावासाठी कूलर, पंख्यांचा वापर सुरू झाला आहे.
ग्रामीण भागातही यंदा लवकरच कूलर, पंखे सुरू करण्याची गरज भासू लागली आहे. वर्षभर बंद असलेल्या कूलरमध्ये बिघाड झाल्याने नागरिक कारागिरांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे कूलर व पंखे दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना सध्या मोठी कामे मिळत असून त्यांच्या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. यासोबतच नवीन कूलर व पंखे खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. दरम्यान, कूलर दुरुस्ती तसेच सुटे भागांच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिकांना अधिक खर्च करावा लागत आहे.
पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने साहित्याचे दरही वाढले आहेत. काही कारागिरांनी मजुरीचे दर वाढविल्याने खर्चात आणखी भर पडली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतकरी व मजुरांच्या कामावर परिणाम झाला आहे. पूर्वी सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत कामे केली जात होती; मात्र आता कडक उन्हामुळे कामाचे वेळापत्रक बदलले आहे.
जनावरांनाही उष्णतेचा फटका
वाढत्या तापमानाचा फटका मानवांसह जनावरे, पक्षी यांनाही बसत आहे. जनावरे रानात चरण्यापेक्षा सावलीत राहण्यास प्राधान्य देत आहेत. येत्या काळात पाणवठे, विहिरी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.