Double sowing crisis in Umarga taluka
उमरगा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात अनेक वर्षांनंतर प्रथमच यावर्षी बिगर मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. परंतु गेल्या बारा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने खरिपाची पेरणी केलेली पिके पावसा अभावी माना टाकू लागले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान सिंचन सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी कोवळी पिकांना स्प्रिंकलरने पाणी देण्यासाठी धडपड करीत आहेत. तर पावसाची उघडीप पाहून अनेकांनी पेरण्या थांबविल्या आहेत.
तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात वेळवर पाऊस झाला, वेळेवर पेरणी होऊन उत्पन्न मुबलक होईल आशेने शेतकऱ्यांनी खरिप पेरणी साठी न डगमगता नव्या जोमाने तयारी केली. कर्ज, हातउसने, सावकाराकडे घरातील दाग दागिणे गहान ठेवीत कर्ज घेतले. बाजारातील महागडी खते, बी बियाणाची खरेदी केली.
काही ठिकाणी जमिनीला वापसा नसल्याने पेरणी करणे शक्य नव्हती. बऱ्याच उथळ व हलक्या जमिनीत पेरणीचे कामे आटोपून घेण्यात आली. सोयाबीन सोबत तूर, उडीद, मुग आदी पिकांना प्राधान्य दिले. शेतकऱ्यांनी बैलजोडी पेक्षा ट्रॅक्टरने पेरणी जलद गतीने सुरू केली. आतापर्यंत ७७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पेरणी नंतर बारा ते तेरा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे.
त्यामुळे पेरणी केलेले क्षेत्र घोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पेरणी नंतर पाऊस गायब झाल्याने आकाशात काळेकुट्ट वांझोटे ढग, दिवसभर सोसाट्याचा वारा आणि वातावरणात ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत चालला आहे. येत्या चार ते पाच दिवसांत पाऊस पडला तरच पिकांना जीवनदान मिळू शकते. अन्यथा निसर्गाच्या भरवशावर खेळलेला जुगार वाया जाणार की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे वरूण राजाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. तालुक्यात खरीप ७५ हजार ४१६ हेक्टर खरिप पेरणी क्षेत्र आहे. आतापर्यंत ५८ हजार ७११ हेक्टर क्षेत्रात ७७.८४ टक्के पेरणी झाली आहे. यात ३९ हजार ८४ हेक्टरवर सोयाबीन व इतर गळीत पिकाची सर्वाधिक पेरणी झाली आहे. त्या खालोखाल १९ हजार ३३० हेक्टरवर खरीप, तूर, मूग, उडदाची पेरणी झाली आहे. तर सर्वात कमी २९७ हेक्टरवर ज्वारी, बाजरी, मका, साळ पिकांचा समावेश आहे.
तालुक्यात पावसाने दडी मारल्याने सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी खरीप पिके जगविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. उपलब्ध पाण्यावर ठिबक व तुषार सिंचनाद्वारे कोवळी पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पाणी असूनही दिवस भरात कमी दाबाने तसेच वारंवार खंडित वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतीला दिवसा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.