धाराशिव : जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी तसेच आठ पंचायत समितींच्या 110 गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असतानाही महायुती व महाविकास आघाडीची एकत्र लढण्याबाबतची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, गट कोणाला सुटणार? या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने त्यांची घालमेल सुरू आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांनी अर्ज भरण्याची तयारी पूर्ण केली आहे. यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून निवडणुका रखडल्याने इच्छुकांची रांग अधिकच वाढली आहे. त्यातच पक्षांची संख्या वाढल्याने मतदारांशी संपर्क साधणे तुलनेने सोपे झाले असले, तरी युती-आघाडीच्या निर्णयांअभावी अंतिम निर्णय अडचणीत सापडला आहे.
महायुतीत भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार की पालिकेसारखे ऐनवेळी स्वबळावर रिंगणात उतरणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतही ठोस स्पष्टता नाही. ठाकरे शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येणार की स्वतंत्र लढणार, याबाबत केवळ चर्चा सुरू असून निर्णय प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदेबाबतचे युती-आघाडीचे निर्णय राज्यपातळीवर घेतले जातील, असे सांगितले जात असल्याने जिल्हास्तरीय नेते स्थानिक परिस्थिती वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यात गुंतले आहेत.
दरम्यान, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील आणि आ. प्रवीण स्वामी हे ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन प्रमुख नेते तयारीला लागले आहेत. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद या तिघांच्या माध्यमातून दिसत असली, तरी पालिका निवडणुकीतील कामगिरी फारशी प्रभावी ठरली नव्हती. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत हे नेते कोणती भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
दुसरीकडे, जिल्ह्यात भाजपचा केवळ एकच आमदार असतानाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पालिका निवडणुकीत संघटन बांधणी करत दणदणीत यश मिळवले. त्यामुळे भाजपचे मनोबल उंचावले आहे. शिंदे शिवसेनेचे आ. तानाजी सावंत हे भूम-परंडा पालिकेत एकमेव प्रतिनिधी असतानाही पक्षाला अपेक्षित प्रभाव दाखवता आला नाही; तेथे संजय गाढवे व जाकिर सौदागर यांच्या वैयक्तिक प्रभावामुळे विजय मिळाला.अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना, युती-आघाडीचे निर्णय, नेत्यांच्या हालचाली आणि संभाव्य समीकरणांवर संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा खिळल्या आहेत. इच्छुकांसाठी हा सस्पेन्स कधी संपणार, हा प्रश्नच सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
शिवसेनेची सावध भूमिका
दरम्यान, पालिका निवडणुकीवेळी धाराशिव शहरात भाजपकडून शिवसेनेची फसवणूक झाल्याची भावना आ. तानाजी सावंत यांनी यापूर्वीच बोलून दाखवली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला आ. सावंत आक्रमक राहणार आहेत. हे एका बाजूला खरे असले तरी भाजपशी बोलणी करण्याची जबाबदारी संपर्कप्रमुख राजन साळवी तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर दिली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आ. सावंत काय करणार याकडे कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत.