

लातूर : सरकारला शिक्षकांच्या टीईटी परीक्षा रद्द करायला लावणार आणि संच मान्यता जीआर दुरुस्तीही करायला लावणार, असा शब्द देतानाच महाराष्ट्रातील कमी पटाची एकही शाळा बंद करू देणार नाही, अशी हमी शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी तमाम शिक्षकांना दिला.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने लातूर येथे आयोजित शिक्षक महामंडळ सभेत संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक संभाजीराव थोरात उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष बाळासाहेब मारणे तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब रोहोकले, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय महासचिव आबासाहेब जगताप, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राज्य सरचिटणीस ज.म.मोरे, राज्य कार्याध्यक्ष बलवंत पाटील, राज्य कार्यकारी अध्यक्ष कैलास दहातोंडे, राज्य कार्याध्यक्ष किशन इदगे, राज्य कोषाध्यक्ष विलास चौगुले, राज्य उपाध्यक्ष संतोष कदम, विभागीय अध्यक्ष अनिरुद्ध पवार, राज्य उपाध्यक्ष डी.बी. गुंडूरे, विभागीय अध्यक्ष आप्पाराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षकांच्या टीईटी परीक्षेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली असून ती परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिक्षकावरील अशैक्षणिक कामे रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देऊन राजाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी शिक्षकांना आश्वासित केले. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळवून देऊ, अशा शब्दांत बाळकृष्ण तांबारे यांनी शिक्षकांना अभिवचन दिले.
विभागीय अध्यक्ष अप्पाराव शिंदे यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिस्त व नियमांचे पालन करून संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा शिक्षक नेते केशव गंभीरे यांनी केले. शिक्षकांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगून जिथे प्रश्न गंभीर तिथे केशव खंबीर असे आश्वासन शिक्षकांना दिले. जिल्हाध्यक्ष विजयकुमार गुत्ते यांनी लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची एक नंबरची संघटना करण्याचा मनोदय व्यक्त केला.
या महामंडळ सभेत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम तसेच लातूर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळांचा पुरस्काराने सन्मान व गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष डी.बी. गुंडुरे सर यांना चळवळ भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विभागीय अध्यक्ष अप्पाराव शिंदे यांनाही चळवळ भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.