धाराशिव जि. प.च्या 55 गटांसाठी राजकीय वातावरण तापले pudhari photo
धाराशिव

Dharashiv Zilla Parishad Elections : धाराशिव जि. प.च्या 55 गटांसाठी राजकीय वातावरण तापले

शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज; अध्यक्षपद महिलांसाठी राखीव, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया अखेर जाहीर झाली आहे. मंगळवारी दुपारी निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा करताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, 55 गटांसाठी इच्छुकांची लगबग आणि मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

येत्या शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेत एकूण 55 गट असून, त्यापैकी 14 गट इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी), 9 अनुसूचित जातींसाठी (एससी), तर 1 गट अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहे. उर्वरित 31 गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहेत. यातील एकूण 28 गट महिलांसाठी राखीव असल्याने यंदा जिल्हा परिषदेत महिलाराज पाहायला मिळणार आहे.

राजकीय समीकरणे बदलली

2016 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली होती. मात्र, त्यानंतरच्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज्यातील सत्ताबदलाचे आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीचे पडसाद धाराशिवमध्येही उमटले आहेत. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जुनी समीकरणे मोडीत निघाली आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची ताकद पणाला लागणार आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील, आरोग्यमंत्री तथा आमदार तानाजी सावंत, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे असून, कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT