Dharashiv bus accident 
धाराशिव

Dharashiv bus accident: धाराशिव-येरमाळा घाटात बार्शी-कळंब बस १०० फूट खोल खड्ड्यात पलटली, २७ प्रवासी जखमी; सात गंभीर

सुदैवाने जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

रत्नापूर - ब्रेक निकामी झाल्याने बार्शी आगाराची बार्शी-कळंब बस येरमाळा घाटात सुमारे १०० फूट खोल खड्ड्यात पलटी झाली. ही घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले. त्यातील सात जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी आगाराची एमएच ११ बीएल ९३५३ क्रमांकाची बस बार्शीहून कळंबच्या दिशेने जात होती. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. येरमाळा घाटात बस चढत असताना बस पुढे जात नव्हती. त्यामुळे चालकाने काही प्रवाशांना बसमधून खाली उतरविले, तर काही प्रवासी बसमध्येच बसले होते.

यानंतर चालकाने बस पुन्हा घाट चढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस वर चढत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. बस पाठीमागे येत गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे १०० फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात बसमधील २७ प्रवासी जखमी झाले. त्यातील सात प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच येरमाळा परिसरातील नागरिक तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमींसह इतर जखमींना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

बसच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह

या अपघातामुळे एसटी बसच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बार्शी आगाराची बस ब्रेक निकामी झाल्याने घाटात उलटल्याचे समोर आल्याने बसची वेळोवेळी तांत्रिक तपासणी आणि देखभाल केली जाते का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः घाटमार्गावर धावणाऱ्या बसची ब्रेकसह सर्व यंत्रणांची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे.

सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली तरी २७ प्रवासी जखमी झाल्याने एसटी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन बसच्या तांत्रिक स्थितीची चौकशी करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT