धाराशिव : जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते,तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
मृत व जलसंधारण विभाग धाराशिव व मृत व जलसंधारण विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त वतीने आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संपूर्णतः अभियान 2.0 अंतर्गत आयोजित जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानावरून श्री. पुजार बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जल योद्धा हनुमंत केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मदने, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कटकधोंड, धाराशिव सारथी जि. प. शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विकास गोडसे व स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या मार्गदर्शक श्रीमती वैशाली घुगे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की,पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने आपल्या स्तरावर नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे.पूर्वी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत होते, मात्र आज ‘हर घर जल’ योजनेमुळे अनेक गावांमध्ये घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.ही सकारात्मक बदलाची दिशा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे श्री.पुजार म्हणाले.
जिल्ह्यात दर तीन वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे धरणे, कालवे,बंधारे यांसारख्या प्रकल्पांबरोबरच स्थानिक स्तरावर पाणी साठवणूक आणि पुनर्भरणावर भर देणे आवश्यक आहे, असे सांगून श्री.पुजार म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या घराजवळ सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी शोषखड्डे तयार केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.
‘जलयुक्त शिवार’ योजनेसह विविध शासकीय योजनांद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. नीती आयोग व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रिचार्ज शाफ्टसारखी कामे करून पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू असून, यामुळे भविष्यात दुष्काळमुक्ती साध्य होण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व जल पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमास जिल्ह्यातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्रीमती सायली जाधव यांनी केले.