Vashi Terkheda accident
रत्नापूर : वाशी तालुक्यातील तेरखेडा कडकनाथवाडी रस्त्यावर सोमवारी (दि. २९) रात्री घडलेल्या भीषण अपघाताने पवनचक्की कंपनीच्या निष्काळजी कारभाराचा भयंकर चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पवनचक्कीचे साहित्य वाहून नेणाऱ्या अवजड कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत कडकनाथवाडी येथील चांदपाशा लोहार (शेख) व वसंत जगताप या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांचा संयम सुटला असून, “रस्ते फोडायचे, जीव घ्यायचे आणि जबाबदारी झटकायची?” असा संतप्त सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी प्रशासनाला घेराव घातला. तहसीलदार घटनास्थळी येईपर्यंत पंचनामा व मृतदेह हलवू देणार नाही, असा ठाम व आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
तेरखेडा ते कडकनाथवाडी हा रस्ता पवनचक्की कंपनीच्या जड वाहनांमुळे पूर्णतः उध्वस्त झाला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा लेखी व तोंडी स्वरूपात केली; मात्र कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या निषेधातून संतप्त ग्रामस्थांनी पवनचक्की कंपनीच्या काही वाहनांना आग लावली. घटनास्थळी सुमारे एक हजार नागरिकांचा जमाव जमल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत काशिनाथ जगताप यांनी सांगितले की, “रस्त्यावरून चालणेही अशक्य झाले आहे. आम्ही वेळोवेळी कंपनीला कंपनीला अनेक वेळा सांगूनही दिले, पण त्यांना मानवी जीवांची किंमत नाही. आज दोन निष्पाप जीव गेले, याला पवनचक्की कंपनीच जबाबदार आहे.
रस्ता तातडीने दुरुस्त करून सुरक्षित करण्यात यावा, अन्यथा पवनचक्की कंपनीविरोधात तीव्र व व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कडकनाथवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.