Dharashiv Umarga Law And Order  Pudhari
धाराशिव

Dharashiv Police | उमरगा शहरात गणेशोत्सवात काळात २०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

चार गुंडांच्या हद्दपारीचा प्रस्ताव; विशेष पथकांची रात्रंदिवस गस्त, पोलिसांचे सशस्त्र पथसंचलन

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv Umarga Law And Order

उमरगा : गणेशोत्सव तसेच आगामी सण-उत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावेत, यासाठी उमरगा पोलिसांनी समाजकंटकांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या प्रवृत्तींवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल २०० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच चार गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या हद्दपारीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे.

उमरगा शहरासह पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरवर्षी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यांसह विविध सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. उत्सवाच्या काळात किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर घटनांमध्ये होऊ नये, तसेच समाजकंटकांकडून शांतता भंग होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी हद्दीतील विविध गावांमध्ये बैठका घेऊन ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. या आवाहनाला २९ गावांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उमरगा शहरात ५७, तर ग्रामीण भागात १६५ अशा एकूण २२२ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. मुंबई पोलिस कायदा कलम ५६ अन्वये चार गुंडांच्या हद्दपारीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

सार्वजनिक शांतता अबाधित राहावी, यासाठी कलम १२६ अन्वये ७६ जणांकडून प्रतिबंधात्मक बंधपत्र घेण्यात आले आहे. कलम ९३ अन्वये १६ पैकी पाच जणांकडून अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. याशिवाय कलम १२९ अन्वये पाच, कलम १६३ अन्वये चार, तर कलम १६८ अन्वये तब्बल १५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिस कायदा तसेच दारूबंदी कायद्यानुसारही विविध कारवाया करण्यात आल्या आहेत.

दुष्काळाची तीव्र परिस्थिती लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

विशेष पथकांची करडी नजर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके शहर व ग्रामीण भागात रात्रंदिवस गस्त घालणार आहेत. सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, ओळख लपवून फिरणे, असभ्य वर्तन करणे, बेवारस वस्तू आढळणे तसेच हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आदी प्रकार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सणाच्या उत्साहाला गालबोट लागू नये, यासाठी समाजकंटकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पोलिसांचे सशस्त्र पथसंचलन

सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात जातीय सलोखा आणि शांतता कायम राहावी, या उद्देशाने पोलिस दलातर्फे शहरातून सशस्त्र पथसंचलन करण्यात आले. पोलिसांच्या या पथसंचलनातून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT