

येरमाळा : बार्शीहून कळंबकडे येणाऱ्या बार्शी आगाराच्या एसटी बसचा येरमाळा घाटात ब्रेक निकामी झाल्याने ती सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात पलटी झाल्याची घटना गुरुवारी रात्री (ता. १०) साडेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात ३५ प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बार्शीहून कळंबच्या दिशेने प्रवाशांना घेऊन ही बस येत होती. येरमाळा घाटातील उतारावर अचानक बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस मागे सरकत असल्याचे लक्षात येताच काही प्रवासी खाली उतरले. त्यांनी बसच्या टायरला दगड लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीचा अंधार असल्याने काही प्रवाशांना अंदाज न आल्याने टायरला दगड लावता आला नाही. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात पलटी झाली.
या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, बसच्या मागून येणाऱ्या एका वाहनचालकाने अपघाताची माहिती येरमाळा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. खोल खड्ड्यात पलटी झालेल्या बसमधील जखमी प्रवाशांना बसमधून खाली उतरलेले प्रवासी व पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोराच्या साहाय्याने खड्ड्यातून बाहेर काढले.
जखमी ३५ प्रवाशांना तातडीने उपचारासाठी चार १०८ रुग्णवाहिकांमधून धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, काही प्रवाशांच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली असून, इतर प्रवाशांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
रात्रीच्या वेळी घाटातील खोल खड्ड्यात बस पलटी झाल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, येरमाळा पोलिसांनी तातडीने केलेल्या मदतीमुळे जखमी प्रवाशांना वेळेत रुग्णालयात दाखल करता आले. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.