Umarga Sub District Hospital  Pudhari
धाराशिव

Umarga Sub District Hospital | खंडणीची मागणी, विनयभंग अन् सरकारी कामात अडथळा; उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

वैद्यकीय अधीक्षकांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

Extortion Demand Umarga Sub District Hospital

उमरगा : उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना शासकीय माहितीच्या कारणावरून धमकावत पाच लाख रुपयांची खंडणी मागणे, शासकीय कार्यालयात घुसून विनयभंग करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रफुल्ल श्रावण गायकवाड (रा. औराद) आणि ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव (रा. तुरोरी) यांच्याविरुद्ध उमरगा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २० जुलै) दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कोमल गरुड या आपल्या कक्षाबाहेर जात असताना प्रफुल्ल गायकवाड आणि ज्ञानेश्वर जाधव यांनी त्यांना अडवले. यावेळी प्रफुल्ल गायकवाड यांनी रुग्णालयातील जनरेटरसाठी वापरण्यात येणाऱ्या डिझेलची माहिती मागितली. त्यावर डॉ. गरुड यांनी माहिती हवी असल्यास नियमानुसार अर्ज करण्यास सांगितले.

या उत्तरामुळे संतप्त झालेल्या प्रफुल्ल गायकवाड यांनी, “आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड या माझ्या नातेवाईक आहेत. तुमच्याविरोधात चौकशी लावून नोकरी घालवतो. ते टाळायचे असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील,” अशी धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर जाधव यांनीही पाच लाख रुपये देण्याची मागणी करत डॉ. गरुड यांच्याशी हातापाई केली. तसेच त्यांचा डावा हात ओढून विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर घाबरलेल्या डॉ. गरुड यांनी संबंधितांना कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यास सांगून तेथून निघून गेल्या. काही वेळाने रुग्णालयातील कर्मचारी जनाबाई कुंभार आणि फुलसुंदर यांनी दूरध्वनीवरून प्रफुल्ल गायकवाड व ज्ञानेश्वर जाधव यांनी कार्यालयातील कपाटातून जनरेटरच्या डिझेलची नोंदवही काढून तिचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली.

घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर डॉ. कोमल गरुड यांनी उमरगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून प्रफुल्ल गायकवाड आणि ज्ञानेश्वर जाधव यांच्याविरुद्ध खंडणी, विनयभंग, धमकी देणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत भराटे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT