Father Son Died Electric shock Tuljapur
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे शेतातील विहिरीतून पाईप काढण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का बसून दोन कुटुंबातील पितापुत्रांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि. २७) दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केशेगाव (ता. तुळजापूर) शिवारातील गणपती शिवलिंग साखरे यांच्या शेतात विहिरीतील मोटार कप्पीच्या साह्याने बाहेर काढली जात होती. यावेळी कप्पीचा तोल गेल्याने जवळून जाणाऱ्या ११ केव्ही उच्चदाब विद्युत तारेस कप्पीचा वरचा भाग लागला. काही क्षणातच मोठा विद्युत प्रवाह शरीरातून गेल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.
या भीषण दुर्घटनेत नागनाथ काशिनाथ साखरे (वय ५६) व त्यांचा मुलगा रामलिंग नागनाथ साखरे (वय २५), तसेच काशीम कोंडीबा फुलारी (वय ५४) व त्यांचा मुलगा रतन काशीम फुलारी (वय १७) यांचा मृत्यू झाला आहे. वडील–मुलगा अशा दोन कुटुंबांतील चार जण एकाच वेळी काळाच्या पडद्याआड गेल्याने घटनास्थळी उपस्थितांचे डोळे पाणावले. या दुर्दैवी घटनेमुळे साखरे व फुलारी कुटुंबांवर मोठा आघात झाला असून केशेगाव गावासह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्दैवी घटनेमध्ये नागनाथ व रमिलंग व कासीम व रतन या पितापुत्राचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. साखरे व फुलारी या कुटुंबावर मोठा आघात झाल्याने संपूर्ण केशेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.