Tulja Bhavani Sharadiya Navratri
तुळजापूर : दुर्गाष्टमीनिमित्त मंदिर परिसरातील होमकुंडावर वैदिक होम-हवन विधी पार पडला. या यज्ञ कुंडामध्ये कोहळा व नारळ यांची पूर्णाहुती देऊन होम संपन्न झाला. होमकुंडावरील वैदिक होम-हवन विधीचे यजमान जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार व त्यांच्या पत्नी सौमय्याश्री पुजार यांनी या विधीत सहभाग घेतला.
गणेश विहार येथे कोल्हापूर संस्थानच्या वतीने आयोजित होम-हवन विधीत प्रतिपचंद्र प्रयाग व मंदा प्रयाग हे यजमान म्हणून सहभागी झाले. तसेच, हैदराबादच्या रावबहादूर संस्थानच्या वतीने आयोजित होम-हवन विधीत कोंडो परिवारातील विनीत कोंडो व स्वप्नाली कोंडो यांनी यजमान म्हणून सहभाग घेतला.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार माया माने, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, उपाध्ये बंडू पाठक, तुळजाभवानी उपाध्ये पुजारी मंडळ अध्यक्ष अनंत कोंडो, रामचंद्र पाटील, पुजारी उपस्थित होते.
दुर्गाष्टमीनिमित्त श्री तुळजाभवानी देवीची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. शारदीय नवरात्र महोत्सवातील दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीची ही विशेष अलंकार महापूजा मांडण्याची धार्मिक परंपरा आहे.
धार्मिक आख्यायिकेनुसार, महिषासुर नामक दैत्याने देवतांचा पराभव करून स्वर्गावर ताबा मिळविला होता. त्याच्या अत्याचारांपासून मुक्तता मिळविण्यासाठी देवतांनी आदिशक्तीची प्रार्थना केली. देवतांच्या तेजातून प्रकट झालेल्या जगदंबा मातेने महिषासुराशी घनघोर युद्ध करून त्याचा वध केला आणि देवतांसह समस्त सृष्टीला त्याच्या अत्याचारांतून मुक्त केले.
देवीच्या या विजयाचे, तसेच तिच्या रौद्र, पराक्रमी आणि दुष्टांचा संहार करणाऱ्या स्वरूपाचे स्मरण म्हणून दुर्गाष्टमीच्या दिवशी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते. दरम्यान १८ ऑक्टोबर रोजी श्री तुळजाभवानी देवींची अश्वारूढ छबिना मिरवणूक पारंपरिक धार्मिक पद्धतीने काढण्यात आली.