

तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात सातव्या माळेनिमित्त देवीची शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली. मागील २४ तासांत सुमारे १ लाख ३० हजार भाविकांनी भवानी मातेचे दर्शन घेतले.
मध्यरात्री १ वाजता चरणतीर्थ पूजा संपन्न झाल्यानंतर रात्री दीड वाजल्यापासून धर्मदर्शन आणि मुखदर्शनाच्या रांगांमधून भाविकांना दर्शन सुरू करण्यात आले. सकाळी ७ वाजता दही, दूध आणि पंचामृताने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर नित्योपचार पूजा, आरती आणि नैवेद्य पारंपरिक पद्धतीने अर्पण करण्यात आला. यानंतर देवीसमोर शेषशायी अलंकार महापूजा मांडण्यात आली.
पौराणिक आख्यायिकेनुसार, भगवान विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर विश्राम घेत असताना त्यांच्या कानातील मळापासून शुंभ आणि निशुंभ हे दैत्य उत्पन्न झाले. त्यांनी विष्णूंवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ब्रह्मदेवांनी देवीची स्तुती करून तिला जागृत केले. देवीने प्रकट होऊन दैत्यांचा संहार केला आणि विष्णूंचे रक्षण केले. त्यानंतर भगवान विष्णूंनी आपली शेषशय्या देवीला अर्पण केली. या आख्यायिकेवर आधारित देखावा देवीच्या पुजाऱ्यांनी मांडला होता.
भाविकांनी या महापूजेचे दर्शन घेतले. दरम्यान, तहसीलदार अरविंद बोळंगे आणि तहसीलदार माया माने यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा काळातील नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा पाचव्या ते सातव्या माळेपर्यंत भाविकांची गर्दी दरवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले.
अशी असते 'शेषशायी' महापूजा
शारदीय नवरात्रोत्सवात सातव्या माळेला मांडली जाणारी शेषशायी अलंकार महापूजा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. भगवान विष्णूंची शेषशय्या देवीला अर्पण केल्याच्या पौराणिक प्रसंगाचे हुबेहूब दर्शन या पूजेच्या माध्यमातून भाविकांना घडवले जाते.