Tuljapur Andur Sheep Death
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर व परिसरात शनिवारी (दि.२७) दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे १३ मेंढ्या दगावल्या असून १७ मेंढ्या ओढ्याला आलेल्या वेगवान पाण्यातून वाहून गेल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ,अणदूर येथील सिध्दप्पा आप्पा घोडके हे नेहमीप्रमाणे मेंढ्या चारण्यासाठी महालिंगवाडी शिवारात गेले होते. शुक्रवारी रात्रभर, शनिवारी दिवसभर व रविवारी पहाटेपर्यंत अणदूर परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. शनिवारी दिवसभर मेंढ्या चारुन सायंकाळी घराकडे मेंढ्या घेवून येत असताना पुजारपट्टीतील ओढ्यातून जात होते.अचानक ओढ्याला वेगात पाणी आल्याने त्यात १३ मेंढ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर १७ मेंढ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.
अचानक घडलेल्या घटनेवेळी मेंढ्यांना वाचवण्यासाठी मेंढपाळाने अथक प्रयत्न केले. परंतू वेगवान पाण्यापुढे तो हतबल झाला होता. त्यामुळे सदर मेंढपाळाचे जवळपास ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याच्या उपजीविकेचे साधन पावसाने हिरावून नेले आहे.
रविवारी सकाळी तलाठी महादेव गायकवाड यांनी पंचनामा केला आहे. शिवाय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करुन शासनाकडे अहवाल पाठवल्याचे घटनेचे साक्षीदार विक्रांत दुधाळकर व विशाल गुड्ड यांनी 'दै.पुढारी' शी बोलताना सांगितले. नुकसानग्रस्त मेंढपाळास शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मेंढपाळ बांधवांनी मागणी केली आहे.