धाराशिव : शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि मजबुतीकरण कामांमुळे नागरिकांना सध्या धुळीचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश रस्त्यांवरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून बुजवण्यात आले आहेत. मात्र या मुरुमामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर दिवसभर धुळीचे लोट उठत असून, वातावरण धुरकट झाले आहे. परिणामी वाहनचालक, पादचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
बार्शी नाक्यातील जिजाऊ चौक ते सांजा चौक दरम्यान पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. शहरातील पोलिस ठाण्यापर्यंत एक बाजू पूर्ण करण्यात आली असली तरी त्यानंतर कामाची गती मंदावली आहे. त्यामुळे उर्वरित बाजूवरील मुरूम सैल अवस्थेत असून, वाहतूक सुरू असल्याने धूळ अधिक प्रमाणात उडत आहे. गाडगेबाबा चौक ते बसस्थानक आणि पुढे सांजा चौकापर्यंतही अशीच परिस्थिती आहे.
या शिवाय जिल्हा परिषदेपासून जिल्हा न्यायाधीश निवासस्थानापासून वरुडारोडकडे जाणारा रस्ताही चाळण झाला आहे. असे असतानाही याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. विशेषतः ट्रक, एसटी बससारखी जड वाहने जात असताना दुचाकीस्वारांना समोरचे दृश्य दिसेनासे होते. अचानक धुळीचे ढग उडाल्याने नियंत्रण सुटून लहान-मोठे अपघात घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
धूळ डोळ्यात व नाकात गेल्याने श्वसनाचा त्रास वाढत असून, शालेय विद्यार्थ्यांना सकाळ-संध्याकाळ मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन व संबंधित कंत्राटदाराने किमान दिवसातून दोन वेळा रस्त्यावर पाणी फवारणी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. नियमित पाणी फवारणी केल्यास धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. कामाचा वेग वाढवून रस्ते लवकरात लवकर पूर्ण करणेही आवश्यक आहे.
अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शहरातील अशी चाळण झालेल्या रस्त्यांवर मुरूम टाकलेला आहे. त्यामुळे धुळीचा त्रास वाहनचालकांना होत आहे. हे खरे आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवर दिवसातून दोन वेळा पाणी मारण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना तसे इतरही संबंधित कार्यालयांना बोलणार आहोत.अर्चना विशाल शिंगाडे, नगरसेवक, धाराशिव.