Dharashiv Rain: Farmers in crisis due to lack of rain, sowing done on 54 thousand hectares
तानाजी सुपेकर
भूम: कधीच झालेले नाही पण यावर्षी मे महिन्यात भूम तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या आधी कधीही न पडलेला असा विक्रमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या आशेने पूर्ण केल्या. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरवल्याने आणि जुलै महिन्यात अर्धा महिना उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पिके माना टाकू लागली आहेत.
तालुक्यातील ६२ हजार ४३४ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी यावर्षी ५४ हजार २०५ हेक्टरवर म्हणजेच ८६.८२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. प्रमुखतः सोयाबीन, मूग, उडीद, मका, तूर अशी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पिकांची उगम व सुरुवातीची वाढ उत्तम झाली होती. मात्र जूनच्या शेवटी व जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.
सोयाबीनवर सध्या खोडअळीचा, करपा रोगाचाही, प्रादुर्भाव आढळत असून पानगळ व खोडांवर अळ्या आढळत आहेत. पान गुंडाळणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन आणि कांद्यावर करपा रोग दिसतोय. उडीद मवा, पिकांमध्येही वाढ खुंटून काही ठिकाणी रोगराईने नुकसान होत असल्याचे चित्र दिसते. अनेक शेतकऱ्यांनी उडीद मोडून त्या जागेवर कांद्याची पेरणी व रोपे टाकण्यास सुरुवात केली आहे. मूग पिकांमध्येही वाळवंटसदृश स्थिती निर्माण झाल्याने पाने पिवळी पडू लागली आहेत. दोन-तीन वेळा फवारणी केल्यावरही प्रादुर्भाव कमी होत नाही.
शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे उपाय अपुरे ठरत असल्याने संकट वाढत चालले आहे. १५ जुलैपर्यंत केवळ ४९.५ टक्केच पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत ती अतिशय कमी आहे.
तूर. ९२७४-२६७२-२८.८१, ज्वार. ४३.४७.-२.०-०४.६०, मूग. २४८७.-७४७- ३०.०३, सोयाबीन, ३५५३१.-४३६८४.१२२.९५, बाजरी.-५०९.२८-००-००,, मका. २०७४.-८९८.४३.२९, उडीद. ९७२२.-६०३७.-६२.१०
तालुक्यात पावसाचा खंड असल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजनाने पिकांची काळजी घ्यावी. ज्या शेतकऱ्यांकडे तुषार सिंचनाची (स्प्रिंकलर) सुविधा आहे, त्यांनी सोयाबीन पिकाला तत्काळ पाणी द्यावे. पाणी देताना तीन ते चार इंच खोलवर ओल जाईल इतपतच पाणी द्यावे, जेणेकरून मातीतील ओलावा टिकून राहील, असे तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे यांनी सांगितले.
पेरणी केल्यापासून पावसाने खंड दिल्यामुळे फार त्रास झाला आहे. आभाळ सतत भरून राहत असल्यामुळे सोयाबीनवर उंटअळीचा प्रचंड प्रादुर्भाव झालेला आहे. सततच्या ढगाळ हवामानामुळे पिकाला पुरेसं ऊन मिळत नाही, त्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. यामुळे सोयाबीनवर विविध बुरशीजन्य रोगही मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे, असे चिंचोली येथील शेतकरी सुरेश आबा हुरकूडे यांनी सांगितले.