महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा; चिमुकल्यांच्या नृत्याने वेधले लक्ष  file photo
धाराशिव

Dharashiv News : महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा; चिमुकल्यांच्या नृत्याने वेधले लक्ष

धाराशिव : अहिंसा व एकात्मतेचा संदेश, शहरात उत्साहपूर्ण वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv Procession on the Occasion of Mahavir Jayanti; Little Ones' Dance Steals the Spotlight

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : भगवान महावीर यांच्या २६२५ व्या जन्मकल्याणकानिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी धाराशिव शहरात भव्य व उत्साहपूर्ण शोभायात्रा काढण्यात आली. "जिओ और जीने दो", "अहिंसा परमो धर्म" अशा घोषणांनी शहर दुमदुमले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी माऊली चौक येथील श्री १००८ पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीरांच्या प्रतिमेच्या जलाभिषेकाने झाली. त्यानंतर ध्वजारोहण व पूजन करून नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्या हस्ते शोभायात्रेला प्रारंभकरण्यात आला.

यावेळी नगरसेवक राहुल काकडे, सतीश कदम, रवी मुंडे, वैशाली मुंडे, पंकज पाटील, तुषार निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शोभायात्रा माऊली चौक, गुजर गल्ली, मारवाडी गल्ली, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळा मारुती रोड, निंबाळकर गल्ली मार्गे फिरवण्यात आली.

मार्गावर विविध ठिकाणी फुलांची उधळण, रांगोळी आणि पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते लहान मुलांचे मनमोहक नृत्य. जैन तत्त्वज्ञानावर आधारित गीतांवर चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याने एकात्मता व अहिंसेचा संदेश प्रभावीपणे मांडला. या सादरीकरणासाठी प्रिया कांबळे व वंदना गांधी यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, महावीर जयंतीचे औचित्य साधून फडकुले कुटुंबीयांनी मंदिरालगतची जागा दान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच विविध धार्मिक विधी, पंचामृत अभिषेक, शांतीधारा व मंगल आरतीही पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उल्हास चाकवते, संतोष शहा, निलमकुमार अजमेरा, अमित गांधी, अतुल अजमेरा, प्रशांत येणेगुरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT