Paranda Taluka Heavy Rain
परंडा: परंडा शहरासह तालुक्यात रविवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील सर्वच नद्यांना महापूर आला असून अनेक रस्ते, पुल पाण्याखाली गेले आहेत. परंडा शहराचे दळणवळणाचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
सर्वात मोठे असलेले सीना कोळेगाव, निन्म खैरी, इनगोंदा साठवण तलाव, खासापूरी प्रकल्प, साकत मध्यम प्रकल्प, चांदणी धरण आदी धरणे ओव्हर फ्लो झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चांदणी व उल्का नदीच्या पुरात काही वस्त्यांवर नागरिक अडकले असून एनडीआरएफच्या वतीने हेलीकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. सध्या नरसाळे वस्ती वरील अंदाजे सहा व्यक्तींना हेलीकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षितस्थळी हलविले आहे. हिवरे वस्तीवर अडकलेल्या नागरिकांचा हेलीकॅप्टरच्या सहाय्याने एनडीआरएफचे जवान शोध घेत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुढील मदत कार्यासाठी मिलेटरी फोर्स मागवण्यात आला असल्याची माहिती परंडा तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या शेळगाव येथील खैरी नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने करमाळ येथे होणारी वाहतूक बंद झाली आहे. वाटेफळ येथील नळी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने आनाळ्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.
आवार पिंपरी येथील उल्फा नदीचा पुल पाण्याखाली गेल्याने कुर्डूवाडी कडे जाणारी वाहतूक बंद, तर बार्शीकडे जाणरा रस्ता सोनगिरी जवळ पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. अनेक गावात पाणी शिरले असून प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.