Dog Attack on Census Employee
परंडा : शहरातील माळी गल्ली परिसरात जनगणनेचे काम सुरू असताना प्रगणक मारुती भोरे यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात स्वतःचा बचाव करताना ते नालीत पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय मोडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती मंदिराच्या पाठीमागील भागात जनगणनेचे काम करण्यासाठी मारुती भोरे गेले होते. यावेळी एका घरात जनगणनेसाठी माहिती घेत असताना तेथील दोन कुत्र्यांनी अचानक त्यांच्या अंगावर धाव घेत हल्ला केला. घाबरलेल्या अवस्थेत बचाव करण्याचा प्रयत्न करताना त्यांचा तोल गेला आणि धावताना ते नालीत पडले.
या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित महिलांनी तत्काळ मदत करत त्यांना कुत्र्यांपासून वाचविले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर असल्याचे सांगितले.
या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाची पुन्हा चर्चा सुरू झाली असून नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तसेच जनगणनेसारख्या महत्त्वाच्या कामासाठी घराघरात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.