Dharashiv News: How to celebrate Diwali on a budget of five thousand?
लोहारा, पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाच्या अनियमिततेचा फटका खरीप हंगामाला बसला असून, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीवर हजारो रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हाती अपेक्षित उत्पन्न आलेले नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रब्बी पेरणीचीही शाश्वती नाही. या आर्थिक संकटात दिवाळीसाठी जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अपुरी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
दिवाळीसाठी कपडे, किराणा, फराळ आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करताना वाढत्या किमतींचा सामना करावा लागत आहे. खाद्यतेलाच्या एका डब्यासाठीच सुमारे अडीच हजार रुपये खर्च होत असल्याचे शेतकरी सांगतात.
अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांत सण साजरा करायचा, घरखर्च भागवायचा की कर्जाची परतफेड करायची, असा पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना केवळ सणापुरती मदत देण्याऐवजी आर्थिक संकटातून सावरण्यासाठी भरीव आधार देण्याची गरज आहे. नुकसानभरपाई आणि पीकविम्याची रक्कम वेळेत मिळावी, तसेच रब्बी पेरणीसाठी आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
खरिपाच्या नुकसानीतून सावरण्याचे आव्हान
शेतीतून उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. आधीच कर्जाचा बोजा असताना पुढील हंगामासाठी पुन्हा पैसा उभा करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पेरणीसाठी आवश्यक ओलावा आणि आर्थिक तरतूद नसल्याने रब्बी हंगामाबाबतही चिंता वाढली आहे.