धाराशिव : एसटीतर्फे आता सवलतीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) बंधनकारक केले आहे. प्रत्यक्षात त्याच्या नोंदणीसाठी धाराशिव बसस्थानकातील केंद्र मानसिक छळछावणी ठरत आहे. सकाळी दहाला उघडून ११ वाजता नोंदणी बंद केली जात असल्याने अगदी पहाटे सहापासून रांगेत उभ्या असलेल्या ज्येष्ठ नागरिक, महिलांची परवड होत आहे. या केंद्रातील कर्मचारीही अतिशय उद्धट व अरेरावीने बोलत असल्याने प्रवाशांचा पाणउतारा होत आहे तो वेगळाच.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी चार दिवसांपूर्वी हे एनसीएमसी कार्ड सवलतधारक प्रवाशांसाठी १ ऑगस्टपासून बंधनकारक असणार असल्याचे जाहीर केल्यानंतर प्रवाशांची कार्ड नोंदणीसाठी गर्दी वाढली आहे. कार्ड नोंदणी संगणकावर केली जाते. ११ वाजता नोंदणी बंद होते. त्यामुळे सकाळी सहापासून सवलतधारक प्रवासी बसस्थानकात असलेल्या नोंदणी केंद्रासमोर रांग लावतात.
सकाळी ९ वाजता केंद्र सुरू होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात पावणे दहा ते दहाच्या सुमारास हे कार्यालय उघडले जाते. या केंद्रात संबंधित कंपनीचे कर्मचारी असतात. त्यानंतर अकरा वाजताच ते नोंदणी बंद करतात. या दरम्यान केवळ १० ते १५ जणांची नोंदणी होत असते. परिणामी रांगेत थांबलेल्या व दूरवरून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे.
याबाबत संबंधित केंद्रातील कर्मचारीही उद्धट उत्तरे देत असल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. या कंपनीवर एसटी महामंडळाचे नियंत्रण नसेल तर त्यांना बसस्थानकात जागा दिली कशाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
पहाटे कोणी यायला सांगितले?
याबाबत संबंधित कंपनीच्या कर्मचार्याशी संपर्क साधला असता ‘एसएम’ अशा लघुरूप नावाने बोलणार्या त्या कर्मचार्याने उद्धट प्रतिप्रश्न करीत या प्रवाशांना पहाटे कोणी यायला सांगितले? असा प्रश्न केला. आम्हाला मानसिक त्रास होतोय. आम्ही ही बाब कंपनीला कळविली आहे; पण उपयोग नसल्याचे त्याने सांगितले. आमच्याकडे कर्मचारी कमी असल्याने बाहेर नेमलेल्या एजंटकडून नोंदणी करून घ्या, असा सल्लाही त्याने दिला.
आम्ही केवळ बसस्थानकातील जागा या कंपनीला दिली आहे. येथील सेंटरवर संबंधित कंपनीचे नियंत्रण आहे. तरीही कधी अडचण आली तर आम्ही लक्ष देतो. पण अंतिम जबाबदारी संबंधित कंपनीची आहे.प्रवीण भोंडवे, आगार व्यवस्थापक, एसटी.