धाराशिव

Dharashiv Municipal Election : महाविकास आघाडीचे एकीचे सूर !

धाराशिव : तणाव असला तरी तिन्ही पक्षांचा चर्चेवर भर

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : भीमाशंकर वाघमारे

जिल्ह्यातील शहरी भागातील सत्ताकेंद्रे ताब्यात घेण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीत मोठी चुरस आहे. त्यातूनच मित्रपक्षांचा जास्तीच्या जागांसाठी दबाव आहे. तशातही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकीचे सूर आळवत चर्चेवर भर दिला आहे. ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी तसेच काँग्रेस नेत्यांनी बैठका घेऊन एकीने निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.

मागील वेळी म्हणजे २०१६ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकांत हे तिन्ही पक्ष जिल्ह्यातील प्रमुख सत्ताधारी होते. त्या वेळी एकमेकांचे विरोधकही होते. कालांतराने राज्य पातळीवर झालेल्या बदलांमुळे आता मागील वेळचे प्रमुख विरोधक एकत्र आले आहेत. त्यांचीच महाविकास आघाडी तयार झाली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या तुलनेत काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद मर्यादित झाली आहे.

त्यामुळे जागा वाटपावेळी या दोन्ही पक्षांना समजुतीची भूमिका घ्यावी लागणार आहे. सर्वच आठही शहरांतील काही जागांवर तिन्ही पक्षांचा दावा असणार आहे. तर नगराध्यक्षपदावरुनही तणातणी सुरु आहे. अशा स्थितीतही हे पक्ष एकजुटीचा संदेश देत असले तरी जागावाटपावरुन तणाव असणार आहे. स्वतःचा असा मतदार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्याने तो मतदारही विभागला आहे. तर काँग्रेसचे जाळे जिल्ह्यात असले, तरी मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर ताकद घटली आहे. शिवसेनेचेही दोन भाग झाले असले तरी या पक्षाचे जिल्ह्यात दोन आमदार, एक खासदार असल्याने हा पक्ष महाविकास आघाडीत मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल.

आठही पालिकांत या तिन्ही पक्षांची ताकद चांगली असली तरी गेल्या दोन वर्षांत अनेक प्रमुख नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे कार्यकर्त्यांना जीव तोडून मेहनत घ्यावी लागणार आहे. महायुतीचे आव्हान समोर असल्याने खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील, रणजित पाटील तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांना तोडीस तोड आखणी करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणावे लागणार आहे. नऊ वर्षांनंतर या निवडणुका होत असल्याने कोणाची नेमकी ताकद किती हेही या रूपाने स्पष्ट होणार आहे. उमरगा, तुळजापूर, कळंब, धाराशिव, परंडा, भूम या पालिका ताब्यात घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी ताकद पणाला लावली जात आहे. महायुतीने या शहरांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महायुती राज्यात सत्ताधारी पक्ष असल्याने त्यांच्या तोडीस तोड नियोजन करताना तिन्ही पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

Dharashiv Latest News

जिल्ह्यात आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणेच महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविणार आहोत. आमचे तिन्ही पक्षांचे संबंध, समन्वय उत्तम असून आमच्या सतत बैठका होत आहेत.
ॲड. धीरज पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

दोन नेत्यांवर मोठी जबाबदारी

महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते म्हणून सध्या तरी शिवसेनेकडून (ठाकरे) खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आ. कैलास पाटील यांच्यावरच मोठी जबाबदारी असेल. कारण 'मविआ'चा चेहरा म्हणूनच त्यांची ओळख आहे. तिन्ही पक्षांत समन्वय ठेवून समविचारी पक्षांना सोबत घेण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे.

सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन महाविकास माध्यमातूनच पालिका निवडणुका लढवणार आहोत. प्रत्येक शहरात आमची सत्ता यावी या दृष्टीने तिन्ही पक्षांची रणनीती, नियोजन तयार आहे.
प्रतापसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT