कळंब : धाराशिव जिल्ह्यात 'एमडी' (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कळंब शहरालगत कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ड्रग्जच्या २९ पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
निखिल जाधव आणि अरविंद कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे पथक ३ ऑगस्ट रोजी गस्त घालत होते. यावेळी कळंब-येरमाळा मार्गावरील पाझर तलावाजवळ हे दोघे येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंच आणि फॉरेन्सिक व्हॅनसह तेथे जाऊन सापळा रचला.
यावेळी दोन संशयित दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे आढळले. पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे २९ पारदर्शक प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये ११.२१ ग्रॅम पांढऱ्या रंगाची स्फटिक स्वरूपातील पावडर (एमडी ड्रग्ज) आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल तात्काळ जप्त केला असून, याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाची धडक कारवाई
पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक खटके, सपोनि मगर यांच्यासह कळंब पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई यशस्वी केली.