ठाकरे सेनेच्या नऊ नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नगरसेविकेने भाजपमध्ये प्रवेश केला Pudhari
धाराशिव

Dharashiv Politics | कळंब नगरपालिकेत राजकीय भूकंप; ठाकरे गटाच्या 9, काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

विकासासाठी प्रवेश की राजकीय समीकरणे? कळंब शहरासह तालुक्यात चर्चेला उधाण

पुढारी वृत्तसेवा

Kalamb Municipal Council Congress Shiv Sena Councillors Join BJP

कळंब : नगरपालिका निवडणुकीला अद्याप वर्षही पूर्ण झालेले नसताना कळंब नगरपालिकेतील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नऊ नगरसेवकांसह काँग्रेसच्या एका नगरसेविकेने भाजपमध्ये प्रवेश केला. या राजकीय घडामोडीमुळे कळंब शहरासह तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सुनंदा शिवाजी कापसे लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यांनी ठाकरे सेनेच्या रश्मी संजय मुंदडा यांचा २,२५४ मतांनी पराभव केला होता. निवडणुकीत शिवसेनेचे चार, भाजपचे सहा, ठाकरे सेनेचे नऊ आणि काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला होता.

सभागृहात प्रभावी नेतृत्व राहावे यासाठी आमदार कैलास पाटील यांनी ठाकरे सेनेचे नेते संजय मुंदडा यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, मुंदडा यांच्यासह ठाकरे सेनेच्या नऊ नगरसेवकांनी आणि काँग्रेसच्या एका नगरसेविकेने गुरुवारी (दि.२०) सोलापूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.

दरम्यान, संजय मुंदडा यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे हा आपला अंतिम पक्षप्रवेश असल्याचे सांगत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजपमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. या पक्षांतरावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत.

विकासासाठी प्रवेश की राजकीय समीकरणे?

कळंब नगरपालिका यापूर्वीच महायुतीच्या ताब्यात असून राज्यातही महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे विकासकामांसाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्यामागे नेमका कोणता राजकीय हेतू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आगामी काळात या पक्षांतराचा शहराच्या विकासावर काय परिणाम होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक

संजय मुंदडा, सागर मुंडे, इंदुबाई नंदू हौसलमल, सफुरा शकील काझी, जमील खुरेशी, ज्योती हारकर, रुक्सना बागवान, वनमाला शंकर वाघमारे, आशा सुधीर भवर आणि अर्चना प्रताप मोरे (काँग्रेस).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT