Kalamb MD Drugs Seized Pudhari
धाराशिव

Dharashiv MD Drugs | कळंबमध्ये एमडी ड्रग्जविरोधात मोठी कारवाई; २ आरोपी अटकेत, २९ पुड्या जप्त

ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली

पुढारी वृत्तसेवा

Kalamb MD Drugs Seized

कळंब : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरनंतर आता कळंब शहरातही एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत ११.२१ ग्रॅम वजनाच्या एमडी ड्रग्जच्या २९ पुड्या जप्त करण्यात आल्या असून सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. यामध्ये सुमारे ५५ हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज आणि ५५ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.

या प्रकरणी निखिल युवराज जाधव आणि अरविंद दादाराव कांबळे यांच्याविरुद्ध पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क) व २२(ब) अन्वये (गुन्हा क्र. ३२६/२०२६) कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शकील शेख करीत आहेत.

यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने तामलवाडी येथे कारवाई करून तुळजापूर परिसरातील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर आता कळंबमधील ही कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कळंब पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT