धाराशिव : शहरातील कचरा डेपो हटविण्याच्या मागणीची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २४ तासांत दखल घेतली. लातूर विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १६) डेपोची पाहणी करून नागरिक, विद्यार्थी, महिला आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. पाहणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. गुरुवारी (दि. १५) त्यांनी नगरसेवक पंकज पाटील यांच्यासह मुंबई येथे जाऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रशासनाकडून माहिती घेतली.
२५ एकर जागा कुठे आहे? : पंकज पाटील
नगरपालिका आणि जिल्हा प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. २५ एकर जागा पाहिल्याचे सांगितले जात असले तरी ती नेमकी कुठे आहे, हे स्पष्ट केलेले नाही. हा वेळकाढूपणा असल्याचा आरोप नगरसेवक पंकज पाटील यांनी केला.मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी सांगितले की, कचरा डेपोच्या प्रश्नावर नगरपालिका सकारात्मक आहे. पुरेशी जागा मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली असून, २५ एकर जमीन मंजूर होण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.
डेपो हटेपर्यंत लढा सुरूच : वाघमारे
कचरा डेपोच्या प्रश्नावर नगरपालिकेच्या दारात कचरा टाकून निषेध केला, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केले.आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून न्यायाची अपेक्षा असून, डेपो हटेपर्यंत लढा सुरूच राहील, असे रवींद्र वाघमारे यांनी सांगितले.