Dharashiv News : धाराशिव जिल्ह्याला आतापर्यंत १,०९८ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले  File Photo
धाराशिव

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्याला आतापर्यंत १,०९८ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले

भाजपने केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv district has received a grant of Rs 1,098 crore so far

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : रब्बी पेरणीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अतिरिक्त मदतीचा शासन आदेश मंगळवारी निर्गमित झाला असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल ५७७ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १८९ कोटी, सप्टेंबरमधील नुकसानीसाठी २९२ कोटी आणि खरवडून गेलेल्या जमिनींसाठी ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण १,०९८ कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्यासाठी मंजूर झाले असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संवेदनशीलपणे निर्णय घेतला. रब्बी हंगामात पेरणीसाठी तीन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर १० हजार रुपयांची अतिरिक्त मदत देण्यात आली आहे. नुकसानीची व्याप्ती मोठी असल्याने अधिकची मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जूनपासून सप्टेंबरपर्यंतच्या पावसामुळे जिल्ह्यात तब्बल सहा शासन निर्णयांद्वारे दिलासा देण्यात आला आहे. आतापर्यंत पावणेतीनशे कोटी रुपयांची मदत वितरित झाली असून उर्वरित मदत युद्धपातळीवर वाटप सुरू आहे. दरम्यान, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ३,२९५ कोटी रुपयांच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

राज्याचा ५० टक्के हिस्सा देण्यास महायुती सरकारने मंजुरी दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हावासीयांच्या वतीने आमदार पाटील यांनी आभार मानले. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सदस्य नितीन काळे, संताजी चालुक्य आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT