धाराशिव : भावाच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना दि. ९ रोजी घडली. सकाळी ६.३० च्या सुमारास भूम तालुक्यातील सुक्टा या गावालगत ही दुर्घटना घडली.
ईट येथील वकिल असलेले दत्तात्रय विष्णू भोसले (वय ४८) हे भूम याठिकाणी वकिली करत याठिकाणीच वास्तव्यास होते. त्यांचे लहान भाऊ दादा विष्णू भोसले (वय ४३) यांचे गेल्या १० दिवसापूर्वी आजारी असल्याने निधन झाले होते.
त्यांचा दि. ९ रोजी राक्षसभुवन याठिकाणी दहावाचा कार्यक्रम होता. त्यामुळे ते सकाळी भूमहून ईटकडे निघाले होते. मात्र त्यांची दुचाकी सुक्टा या गावाजवळ आले असता पुलाच्या वळणाजवळ अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले होते.
त्यांना भूम येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूर याठिकाणी पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र सोलापूर याठिकाणी उपचार चालू असताना त्यांची रात्री प्राणज्योत मावळली.
या घटनेमुळे ईटसह भूम येथील वकिल संघटनामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. यांच्या पाठीमागे पन्ती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दत्तात्रय हे भूम याठिकाणी गेल्या काही वर्षापासून वकिली करत होते.