

बीड/धाराशिव : मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असतानाच, महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोमवारी (दि. २६) दुपारी दीडच्या सुमारास महावितरणच्या विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत दोन्ही जिल्ह्यांत मिळून तब्बल ५५ एकरांवरील ऊस जळून खाक झाला असून एकूण ३४ अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
पहिली घटना बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील फुलसांगवी शिवारात घडली. येथील गट क्रमांक २६३, २६५ आणि २७० मधील उसाच्या पाचटाने अचानक पेट घेतल्याने ३० एकरांवरील ऊस जळाला. या आगीत १९ शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीमोल झाले. दुसरी घटना धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील सौंदना (आंबा) येथे घडली. येथेही शॉर्टसर्किटमुळे २५ एकरांवरील ऊस जळून खाक झाला. गावातील तरुणांनी झाडांच्या फांद्या व ट्रॅक्टरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र कोरड्या पाचटामुळे १५ शेतकऱ्यांचे पीक जळून गेले.
पूर्णा तालुक्यात २ एकर ऊस, सोलार पॅनल जळाले
बरबडी (ता. पूर्णा) शिवारात २६ ऑक्टोबर रोजी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २ एकर उभा ऊस आणि सोलार पॅनल जळून खाक झाले. या दुर्घटनेत शिवाजी शिंदे यांचे ४ लाख व देविदास शिंदे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामा करून भरपाई द्यावी आणि उसाची दरकपात रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
एकीकडे कारखान्याचा दिलासा, तर दुसरीकडे भरपाईची प्रतीक्षा
फुलसांगवी येथील जळीत उसाचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन 'जय भवानी सहकारी साखर कारखान्याने' तत्परता दाखवत २४ तासांच्या आत १० ते १२ तोडणी टोळ्या पाठवून ऊस घेऊन जाण्याचा निर्णय घेतल्याने तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गावचे उपसरपंच आजिनाथ तळेकर यांनी कारखान्याचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे, सौंदना येथील बाधित शेतकऱ्यांना महावितरणकडून अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही, असा आरोप युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप पालकर यांनी केला आहे. लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष निधीतून तात्काळ मदत द्यावी आणि जळीत उसावरील २५ टक्के दरकपातीचा जाचक निर्णय तातडीने स्थगित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.