Dharashiv attempts self-immolation for Gadkot Development Corporation
धाराशिव / तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : स्वराज्यकालीन गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन व विकासासाठी स्वतंत्र गडकोट विकास महामंडळाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारण्यात आले आहे. या मागणीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील तब्बल १२० तालुक्यांतील तहसील कार्यालयांना निवेदन देण्यात आले आहे. बुधवारी तर याच मुद्द्द्यावरून एका कार्यकत्यनि अंगावर पेट्रोल ओतून घेत धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास सांगणारे गडकिल्ले, मावळ्यांच्या समाधीस्थळांसह विविध ऐतिहासिक स्थळांचे जतन व विकास व्हावा यासाठी स्वतंत्र गडकोट विकास महामंडळाची स्थापना आवश्यक असल्याची भूमिका जागर प्रतिष्ठानने मांडली आहे.
दरम्यान, या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसन पाटील चव्हाण यांनी तुळजापूर येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून दि. ११ मार्च रोजी उपोषणाचा सातवा दिवस पूर्ण झाला आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
मात्र सात दिवस उलटूनही शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याने आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्यातील विविध सामाजिक संघटना, इतिहासप्रेमी शिवभक्तांकडून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे.
एकाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
दरम्यान, तुळजापूरातील या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत काही कार्यकर्ते कार्यकर्ते बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनी जिल्हाधिकारी बैठक घेत असलेल्या सभागृहात घोषणा देण्याचा प्रयत्न केला. तेथून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले. त्यानंतर संतप्त झालेल्या विशाल जाधव या कार्यकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पहिल्या मजल्यावरील दालनाबाहेर (पोर्चमध्ये) अंगावर पेट्रोल ओतून घेतले. त्यानंतर त्याने काडेपेटी काढून काडी पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ती विझली. त्यानंतर उपस्थित पत्रकार व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धावपळ करून त्याला रोखले. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. उपस्थितांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर येथे अनुचित प्रकार घडला असता, अशी चर्चा परिसरात होती.