Dharashiv : 62.53 percent voter turnout in graduate constituency election
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात ६२.५३ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील ७६ मतदान केंद्रांवर एकूण २९ हजार १४५ मतदारांपैकी १८ हजार २२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शहरातील काही मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली; मात्र अनेक ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद कमी होता. उन्हामुळेही मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या मतदारांची संख्या कमी राहिलीअसावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात २२ हजार ७४५ पुरुष आणि ६ हजार ४०० महिला मतदारांची नोंद होती.
त्यापैकी १४ हजार ८५८ पुरुष आणि ३ हजार ३६७ महिलांनी मतदान केले. पुरुषांचे मतदानाचे प्रमाण ६५.३२ टक्के, तर महिलांचे प्रमाण ५२.६१ टक्के राहिले. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा मतदानातील सहभाग कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. इतर प्रवर्गातील मतदारांची नोंद नव्हती.
मतदानासाठी जिल्ह्यात ७६ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसल्या, तर अनेक ठिकाणी केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान पुन्हा अधोरेखित झाले आहे. जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिवसभर अनेक केंद्रांना भेटी देत पाहणी केली. शिक्षण, रोजगार आणि पदवीधरांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळवून देणाऱ्या या निवडणुकीत अपेक्षेच्या तुलनेत मतदानाचा प्रतिसाद मध्यम राहिला. जिल्ह्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली असून, आता निकालाकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
दोन्ही उमेदार भूमिपुत्र
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील हे दोन्ही उमेदवार जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जास्त मतदान होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र नेहमीसारखेच मतदान झाल्याने दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांची घालमेल सुरु होती.