धाराशिव : मुल देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला, त्यानंतर तब्बल ४७ लाख ८८ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे दिल्यानंतरही लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय दगडू मदने (वय ३८, रा. सांजा चौक, धाराशिव) यांनी याबाबत सोमवारी (दि. १७) फिर्याद दिली. त्यानुसार अश्विनी श्रीराम पाटील, पार्वती उत्तम देवकते, भुजंग उत्तम देवकते, रेश्मा भुजंग देवकते (सर्व रा. कार्ला, ता. तुळजापूर), श्रीदेवी दत्ता नन्नवरे, दत्ता नन्नवरे (रा. येलमवाडी, ता. मोहोळ), जयश्री धुळुबा शिरगिरे (रा. तेर) आणि दत्ता गंडदे (रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीनुसार, २०२० पासून १७ ऑगस्ट २०२६पर्यंत आरोपींनी मदने यांना विश्वासात घेऊन मुलाचे आमिष दाखवले. त्यानंतर वेळोवेळी २५ लाख ८८ हजार रुपये रोख आणि २२ लाख रुपये ऑनलाइन, असे एकूण ४७ लाख ८८ हजार रुपये घेतल्याचे नमूद आहे. एवढी रक्कम घेतल्यानंतरही लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आनंदनगर पोलिस तपास करीत आहेत.
पोलिस ‘पीआरओ’च अनभिज्ञ..!
दरम्यान या गुन्ह्यात अधिक स्पष्टता येण्यासाठी ही प्रेसनोट पाठवलेल्या पोलिस पीआरओशी 80072 69000 या क्रमांकांवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की कदाचित मूल दत्तक देण्याचाच गुन्हा असावा. नक्की माहिती नाही. तुम्ही आनंदनगर पोलिस ठाण्यात कोणाला तरी विचारा. त्यानंतर तेथील अधिकार्यांचा मोबाईल नंबर मागितला असता तो त्यांनी आमच्याकडे उपलब्ध नाही, अशी माहिती दिली. त्यानंतर मग त्यांनी आनंदनगर पोलिस ठाण्याचा लँडलाईन क्रमांक दिला. त्यावर दोन वेळा प्रयत्न करुनही तो फोन रिसिव्ह केला गेला नाही. आणि विशेष म्हणजे दत्तक प्रकरण यात असेल तर त्याचे कलमही दाखल गुन्ह्यात दिसत नाही.