Demand to immediately fill vacant posts in Bhum and Paranda talukas, including Vashi
वाशी, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद धाराशिवच्या शिक्षण विभागांतर्गत विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक पदांची पदोन्नती व नियुक्ती प्रक्रिया सुरू असताना भूम, परंडा आणि विशेषतः वाशी तालुक्यातील रिक्त पदे प्राधान्याने भरावीत, अशी मागणी शिवसेना गटनेते तथा तेरखेडा जिल्हा परिषद सदस्य विकी चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भूम, परंडा व वाशी तालुक्यातील रिक्त पदांमुळे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असून, याबाबत लोकप्रतिनिधींकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालय, वाशी येथे आवश्यक कार्यालयीन पदांची कमतरता असल्याने दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत.
त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. वाशी बीट हे तालुक्यातील सर्वात मोठे बीट असून, येथील विस्तार अधिकारी पद दीर्घकाळापासून रिक्त आहे. परिणामी शैक्षणिक पर्यवेक्षणावर परिणाम होत असल्याने हे पद तातडीने भरण्याची आवश्यकता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय, वाशी व पारा ही केंद्रे प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाची असल्याने ती रिक्त ठेवू नयेत. समुपदेशन प्रक्रियेदरम्यान वाशी, पारा आणि सरमकुंडी या केंद्रांचा समावेश करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या सर्व बाबींचा विचार करून भूम, परंडा व विशेषतः वाशी तालुक्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांची रिक्त पदे प्राधान्याने भरावीत, अशी मागणी विकी चव्हाण यांनी केली आहे. निवेदन देताना शिक्षक संघाचे सिद्धेश्वर भालेकर, बालाजी ढाणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.