धाराशिव : तालुक्यातील तेर-पळसप राज्य मार्गावरील पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा तोंडावर आला असताना पर्यायी रस्ता पुन्हा वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी या राज्य मार्गाच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून रस्त्याचे व पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, कामाची गती अत्यंत मंद असल्याने वर्षभर उलटूनही पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. तसेच रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे.
यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून अनेकांना श्वसनाचे व ॲलर्जीचे आजार होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, गेल्या पावसाळ्यात पुलाचे काम अपूर्ण असल्यामुळे वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला होता. त्यामुळे काही दिवस हा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता.
यावर्षीदेखील अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थ आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तेर-पळसप मार्ग हा परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असल्याने पुलाचे व रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
गेल्या वर्षभरापासून पुलाचे काम रखडल्यामुळे आम्हाला रोज त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता खोदून ठेवला असल्याने धुळीचे प्रमाण खूप वाढले असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना श्वसनाचे त्रास होत आहेत. मागील पावसाळ्यात पर्यायी रस्ता वाहून गेल्याने काही दिवस गावाचा संपर्क तुटला होता. यावर्षीदेखील तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पुलाचे काम पूर्ण करावे.लक्ष्मीकांत लाकाळ, ग्रामस्थ