

राजापूर : तालुक्यातील मूर गावाजवळ चार ते पाच गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरील मूर-कोलतेवाडी नदीपुलाचे काम तब्बल दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आता तिसरे वर्ष सुरू होऊनही पुलाचे काम पूर्णत्वाकडे जाईल की नाही, याबाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
या पुलाचे बांधकाम दीर्घकाळ रखडल्याने स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ठेकेदार राजेश सावंत यांनी दिवाळीच्या सुमारास पुन्हा काम सुरू केले होते. मात्र सहा ते सात महिने उलटूनही पुलाच्या दोन्ही बाजूंचे बांधकाम अद्याप अपूर्णच आहे. कामगार दिवसभर निष्क्रिय बसून असल्याचे चित्र असून कामासाठी आवश्यक साहित्य व मशिनरी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने काम रखडत आहे, अशी माहिती कामगारांनी दिली.
या प्रकाराकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गेली तीन वर्षे विविध स्तरावर तक्रारी करूनही प्रशासन जागे होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे. पुलाच्या कामामागे काही मोठ्या व्यक्तींचे हितसंबंध आहेत काय, असा सवालही ग्रामस्थांकडून प्रकर्षाने उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून लवकरच मान्सून दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत पुलाचे काम पूर्ण न झाल्यास मूर परिसरातील अनेक गावांचा दळणवळण संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बांधकाम खात्याच्या नियमानुसार १५ मेनंतर रस्त्यांवर डांबरीकरण करणे टाळले जाते, कारण पावसामुळे ते टिकत नाही. तरीदेखील पुलाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.
मूर-कोलतेवाडी पुलावरून पाचल बाजारपेठेशी संपर्क साधणाऱ्या कोळंब, काजिर्डा, राणेवाडी, जांभवडे, मूर वरचीवाडी, मूर शेटयेवाडी, गुरववाडी, साळवीवाडी आदी गावांतील नागरिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत शाळा व महाविद्यालये सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचाही गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. पुढील दोन दिवसांत पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करून पूर्णत्वाकडे नेण्यात आले नाही, तर ग्रामस्थ एकवटून आंदोलन छेडतील, असा इशाराही नागरिकांनी प्रशासन आणि ठेकेदाराला दिला आहे.