Dharashiv Road Development  pudhari photo
धाराशिव

Dharashiv Road Development : दसमेगाव-वाशी रस्त्याच्या कामात मातीमिश्रित खडी

रस्‍ता अल्‍पावधीत उखडण्‍याची भीती; खर्च वाया जाणार, नागरिकांत नाराजी

पुढारी वृत्तसेवा

वाशी : दसमेगाव ते वाशी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात नियमांना हरताळ फासला जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. रस्त्याच्या कडेला थेट मातीवरच खडी व डांबर टाकले जात असून, काही ठिकाणी खडीमध्ये माती मिसळून ती रस्त्यावर पसरवली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्ता अल्पावधीतच उखडण्याची भीती व्यक्त होत आहे.

डांबरीकरणापूर्वी रस्त्याचा पाया मजबूत करणे, खडी व डांबराचे योग्य प्रमाण राखणे आणि तांत्रिक निकषांनुसार काम करणे आवश्यक आहे. मात्र, या कामात त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याची तक्रार आहे. याबाबत उपविभागीय अभियंता माकनिकर यांच्याशी संपर्क साधला असता, कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.

शाखा अभियंते श्रीराम यांच्याशी मंगळवारी संपर्क साधला असता, कार्यालयीन अंदाजपत्रकाच्या कामात व्यस्त असल्याने ते कामाची पाहणी नंतर करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रत्यक्ष कामाच्या दर्जाबाबतच्या तक्रारींचे निराकरण झालेले नाही. कामाची तातडीने पाहणी करून निकषांनुसार काम होत आहे की नाही, याची खातरजमा करावी. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

दसमेगाव ते वाशी रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार होत नाही. खडीमध्ये माती मिसळून रस्त्यावर टाकली जात आहे. अशा पद्धतीने केलेले काम जास्त काळ टिकणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून कामाची तपासणी करावी आणि अंदाजपत्रकानुसारच काम करून घ्यावे.
अश्विनी सुनील उंदरे, जिल्हा परिषद सदस्य, पारा गट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT