रत्नापुर : कळंब तालुक्यातील दहिफळ जिल्हा परिषद प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात एक अनोखा आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या नावे पोस्टकार्ड पाठवत विद्यार्थ्यांनी एकच विनंती केली आहे "साहेब, आमचा रस्ता दुरुस्त करा... आम्हाला सुरक्षितपणे शाळेत जाता यावे."
शाळेसमोरील मुख्य रस्ता पूर्णपणे उखडला असून पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. दररोज या रस्त्यावरून शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. अनेकदा लहान मुले घसरून पडतात, त्यांचे कपडे खराब होतात, तर काहींना किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत.
तरीही शिक्षणाची ओढ असल्याने ही मुले रोज त्याच खड्ड्यांतून वाट काढत शाळेत पोहोचतात. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी आणि पालकांनी यापूर्वी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदने दिली.
आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. मात्र कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या हस्ताक्षरात पोस्टकार्ड लिहून प्रशासनाला आपल्या वेदना सांगितल्या. या पोस्टकार्डमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या साध्या शब्दांत मांडलेली भावना प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारी आहे.
"आम्हाला चांगला रस्ता द्या... आम्ही सुरक्षित राहिलो तरच शिकू आणि मोठे होऊ," अशी त्यांची निरागस अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
दहिफळचे प्रशांत भातलवंडे म्हणाले, "शाळेच्या रस्त्यासाठी अनेक वेळा निवेदने दिली, आंदोलनाचा इशाराही दिला; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमार्फत पोस्टकार्ड मोहीम राबवण्यात आली आहे.
आता तरी प्रशासनाने जागे होऊन रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल." निरागस विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डातून केलेली ही आर्त हाक प्रशासनापर्यंत पोहोचेल का? शाळेकडे जाणारा रस्ता कधी सुकर होणार? याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.