धाराशिव

Dharashiv News : कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त

लोहारा : शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्यासाठी धावपळ, भीषण संकट

पुढारी वृत्तसेवा

Citizens suffer due to hot weather

कालिदास गोरे

लोहारा : तालुक्यात सध्या विजेचा सुरू असलेला लंपडाव नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कडक ऊन आणि वाढत्या उकाड्याच्या काळात दिवसा तसेच रात्री वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर घरातील पंखे, कूलर बंद पडत असल्याने उष्णतेचा त्रास अधिकच वाढत आहे. लहान मुले, वृद्ध तसेच आजारी नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

एकीकडे नागरिक उकाड्याने त्रस्त असताना दुसरीकडे शेतकऱ्यांसमोरही विजेअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे. खरीप पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना विद्युत पंपांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, वीज कधी येते आणि कधी जाते याचा नेम नसल्याने पिकांना पाणी देण्याचे नियोजन कोलमडले आहे. रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकऱ्यांना मध्यरात्री शेतात जावे लागत असल्याचे चित्र आहे.

प्रशासकीय कामकाजावरही परिणाम याचा परिणाम होत असून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचा फटका शासकीय कार्यालयांतील कामकाजालाही बसत आहे. संगणक, इंटरनेट, प्रिंटर यांसारख्या उपकरणांवर अवलंबून असलेली कामे वीज गेल्यानंतर ठप्प होतात. त्यामुळे विविध कामांसाठी शासकीय कार्यालयात आलेल्या नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.

काही वेळा दिवसाचा मोठा भाग कार्यालयाबाहेर बसून काढावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कार्यालयीन कामकाज ठप्प होत असल्याने विविध दाखले, अर्ज, नोंदी तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांना पुन्हा-पुन्हा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

अंधाऱ्या रात्री सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून रात्रीच्या वेळी वारंवार वीज गायब होत असल्याने गावातील अनेक भागात अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. परिणामी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अंधाऱ्या रात्री चोरीच्या घटना वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रस्ते, गल्लीबोळ तसेच सार्वजनिक ठिकाणी पुरेसा प्रकाश नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना ये-जा करतानाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सुरळीत वीजपुरवठ्याची संतप्त मागणी

दिवसा कडक उन्हाचा तडाखा आणि रात्री उकाडा, त्यातच वारंवार वीज गायब होत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी वीज आवश्यक असतानाच घरगुती आणि प्रशासकीय कामांसाठीही अखंडित वीजपुरवठा गरजेचा आहे. वीज वितरण कंपनीने वीजपुरवठ्यातील वारंवार होणारे खंड तातडीने दूर करून दिवस-रात्र नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी संतप्त मागणी नागरिक, शेतकरी आणि विविध घटकांकडून होत आहे. वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवली नाही तर नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT